Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020
*Breking News*
*Navapur Live News*
*खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे- डॉ.राजेंद्र भारुड*
*जिल्हाधिकरी कार्यालयात बैठक सम्पन्न*
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 27 : कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि बाधित व्यक्तिंवर उपचार करण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रतिनिधीसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राजेश पाडवी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, अतिरिक्त शल्य चिकीत्सक डॉ.कांतराव सातपुते, डॉ.राजेंद्र चौधरी,आयएमएचे डॉ.शिरीष शिंदे, दिपक पटेल, राकेश पटेल आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, अधिकाधीक व्यक्तिंचे स्वॅब घेतले जावेत यासाठी नंदुरबार येथे चार आणि शहादा येथील दोन ठिकाणी स्वॅब घेण्याची सुविधा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी अशा जागा सुचविल्यास व लक्षणे असलेल्या रुग्णांना निश्चित वेळी त्याठिकाणी स्वॅब देण्यासाठी पाठविल्यास कमी वेळेत बाधितांबाबत माहिती मिळू शकेल.
येत्या काळात बाधित व्यक्तिंची संख्या वाढण्याची संख्या लक्षात घेता खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यासाठी पुढे यावे. खाजगी रुग्णालयात नियमांच्या अधीन राहून कोविड रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा सुरू करण्यासाठी प्रस्ताव आल्यास अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देता येतील. अशा रुग्णालयांना शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार उपचार करावे लागतील. त्यासाठी स्वॅब नमुने तपासण्याची सुविधा प्रशासनातर्फे देण्यात येईल. नागरिकांना एकत्रितपणे चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार पाडवी म्हणाले, कोविडशी लढा देताना वैद्यकीय व्यावसायिकांचे सहकार्य महत्वाचे ठरणार आहे. रुग्णांना अशी सेवा दिल्यास कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक मास्क, फेस शिल्ड आणि पीपीई कीट आमदार निधीतून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय व्यावसायिकांना सुरक्षा प्रदान करण्याबाबतदेखील यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीत वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रशासनातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment