Navapur Live News @ mangesh Yeole माझे कुटुंब माझी जवाबदारी चला तर जवाबदारी स्वीकारूया !
चला जबाबदारी स्विकारूया!
कोविड-19 रुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता या आजाराचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी राज्यभरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या आणि तांड्यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
मोहिमेचा शुभारंभ 15 सप्टेंबर रोजी करण्यात आला. गृहभेटीसाठी जिल्ह्यात 482 पथके तयार करण्यात आली असून 3 लाख 78 हजार घरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक पथकात एक आरोग्य कर्मचारी आणि 2 स्वयंसेवक असतील. हे स्वयंसेवक स्थानिक सरपंच किंवा नगरसेवक निश्चित करतील. प्रत्येक पथक एक दिवसात 50 घरांना भेट देईल. 5 ते 10 पथकामागे एक डॉक्टराची नेमणूक करण्यात आली आहे.
पथकासोबत इल्फ्रारेड थर्मामीटर, पल्स ऑक्सीमीटर, सॅनिटायझार देण्यात येणार आहे. घरातील व्यक्तींचे तापमान आणि ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यात येऊन त्याची नोंद घेण्यात येईल. ताप 100.4 फॅरनहाईट (38 डिग्री से.) किंवा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजनचे प्रमाण 95 टक्क्यापेक्षा कमी असल्यास त्या व्यक्तीस जवळच्या ताप रुग्णालयात संदर्भित करण्यात येईल.
रुग्णास सारीची लक्षणे असल्यासदेखील त्यास रुग्णालयात संदर्भित करण्यात येईल. रुग्णाच्या कुटुंबियांना कोविड -19 प्रतिबंधाचे संदेशही देण्यात येतील. ताप, ऑक्सिजनचे प्रमाण 95 पेक्षा कमी किंवा अतिजोखमीची व्यक्ती यापैकी दोन लक्षणे असल्यास अशा व्यक्तीस जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये संदर्भित करण्यात येईल. घरातील सर्व व्यक्तींची तपासणी पूर्ण झाल्यावर दारावर स्टिकर लावण्यात येणार आहे.
गृहभेटीदरम्यान सामान्य व्यक्तिंना कोविडचा संसर्ग होण्यापासून वाचविण्यासाठी मास्क घालणे, साबणाने हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर, चेहऱ्याला हात न लावणे आदी संदेश देण्यात येतील. ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे असल्यास रुग्णालयात तपासणीचा सल्ला देण्यात येईल. विविध आजार असणाऱ्या व्यक्तींना नियमित आरोग्य तपासणीसाठी संदेश देण्यात येईल. गृह विलगीकरणातील आणि कोविड होवून गेलेल्या व्यक्तींनादेखील खबरदारीचे संदेश देण्यात येणार आहेत.
या मोहिमेत जनतेचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यासोबतच लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभागदेखील अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील युवकांनी कोविड दूत म्हणून मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे. कोविडचे व्यापक संकट लक्षात घेता मर्यादीत प्रयत्नातून नव्हे तर सर्वांच्या सहभागातून यावर मात करणे शक्य होणार आहे आणि त्याच उद्देशाने या मोहिमेचे आयेाजन करण्यात आले आहे.
मोहिमेसाठी प्रशासनातर्फे आवश्यक तयारी करण्यात येत आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत दोन टप्प्यात ही मोहिम होणार आहे. कोविड बाधितांवर उपचारासाठी नियोजन आणि मोहिमेअंतर्गत जोखिमीच्या व्यक्तींची माहिती घेणे अशा देान पातळ्यांवर प्रशासनाला काम करावे लागत आहे. जनतेने यात सहभाग घेतल्यास आणि जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्यास मोहिमेस व्यापक स्वरुप प्राप्त होईल आणि तीचा उद्देशही सफल होईल. विशेषत: सुशिक्षित युवकांनी स्वयंसेवक म्हणून योगदान द्यायला हवे.
कोविडची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी वेळीच संसर्गाची माहिती मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यादृष्टीने हे सर्वेक्षण तेवढेच महत्वाचे असल्याने आरोग्य पथकाला मिळणाऱ्या सहकार्यावर मोहिमेचे यश अवलंबून असणार आहे. ही आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने मोहिमेत लहानमोठ्या स्वरुपात सहभाग घेतल्यास कोविडच्या संकटावर सहजपणे मात करता येईल आणि अनलॉकची प्रक्रीया आणखी वेगाने पुढे नेता येईल....आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भविष्यातील संभाव्य धोका टाळता येईल, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवता येईल. तेव्हा ही जबाबदारी स्विकारताना प्रत्यकाने ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहभाग घ्यायला हवा.
Comments
Post a Comment