Mangesh Yeole @ Navapur Live News जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांचा मोठा निर्णय कोरोना विषाणू बाधित लक्षणे नसलेल्या व्यक्ती ला गृह अलगिकरणास परवानगी
कोरोना विषाणू बाधित लक्षणे नसणाऱ्या गृह अलगीकरणास मुभा
: जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.20: जिल्ह्यातील नागरीकांना गृह अलगीकरणात राहण्यास काही अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यानी अनुमती दिली आहे.
जिल्ह्यात कोविड-19 विषाणू बाधित रुग्ण आढळून येत असून संसर्ग झाल्यानंतर विलगीकरण व अलगीकरण करण्यात येत असल्याने लक्षणे नसताना शासकीय अलगीकरण व विलगीकरण कक्षात राहावे लागत असल्याने नागरीक कोविडची चाचणी करुन घेत नाही. त्यामुळे नागरिकांनी सौम्य लक्षणे असल्यास किंवा कोविड बाधिताच्या संपर्कात आल्यास चाचणी वेळेवर करून घ्यावी यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे.
गृह अलगीकरणासाठी रुग्णांची पात्रता
वैद्यकीय पडताळणीअंती लक्षणे नसणाऱ्या बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्याने प्रमाणीत केल्यास गृह अलगीकरणास अनुमती देण्यात येईल. त्यासाठी रुग्णांच्या घरामध्ये स्वतंत्र स्नानगृह व शौचालयाची सुविधा उपलब्ध असावी व संपर्कात येणाऱ्या परिवारासाठी विलगीकरणाची पुरेशी सुविधा असावयास हवी. रोग प्रतिकार शक्तीचा अभाव असणाऱ्या रुग्णांना (एचआयव्ही, ट्रान्सप्लांट रेसिपिएंट, कॅन्सर थेरेपी इ.) गृह विलगीकरणात राहण्याची मुभा उपलब्ध नसेल. 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेले रुग्ण तसेच इतर आजार (उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्दय विकार, फुफ्फुस, जठर, मुत्रपिंड विकार, सेरेब्रो-व्हास्कुलर इत्यादी जुनाट आजार) असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याची मुभा नसेल.
गृह अलगीकरण रुग्णाने आपल्या घराच्या दर्शनी भागावर लाल रंगाने कोविड-19 गृह अलगीकरण दिनांक पासून ते दिनांक पर्यंत अशा आशयाची पाटी लावणे बंधनकारक राहील. चोवीस तास कालावधीसाठी काळजी घेणारी व्यक्ती असणे बंधनकारक असेल. गृह विलगीकरणाच्या संपुर्ण कालावधीत काळजीवाहू व्यक्ती व कोविड हॉस्पिटल यांच्यात कायम संपर्क असणे बंधनकारक असेल. वैद्यकीय अधिकाऱ्याने सुचविल्यानुसार विहित पद्धतीनुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्तींनी हायड्रॉक्सील क्लोरोक्विन औषध घेणे बंधनकारक राहील.
रुग्णाने आरोग्य सेतू ॲप मोबाईल वर डाऊनलोड करणे आणि संपूर्ण कालावधीत ब्ल्यूटूथ व वायफाय द्वारे कार्यान्वीत ठेवणे बंधनकारक राहील. सदर व्यक्तीने तालुका कंट्रोल रुम तसेच स्थानिक आरोग्य तपासणी टीम यांच्याशी दिवसातून तीन वेळा संपर्क साधुन आपल्या आरोग्याच्या सद्यस्थिती बाबत माहिती देणे बंधनकारक राहील.
सदर व्यक्तीने विहीत नमुन्यातील हमीपत्र भरुन देणे तसेच गृह विलगीकरणाबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटी व शर्ती तसेच नियमावली यांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आवश्यक राहील. तसेच https://www.mohfw.gov.in/pdf/Guidlineforhomequaran tine.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या गृह विलगीकरणाच्या नियमाव्यतिरिक्त देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करणे काळजीवाहू व्यक्ती व रुग्ण यांच्यावर बंधनकारक राहील.
वैद्यकीय मदत घेणे बाबत
रुग्ण व काळजीवाहू व्यक्ती यांनी वेळोवेळी स्वत:च्या तब्येतीकडे व लक्षणांकडे लक्ष ठेवावे. खोकला,ताप ,श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तात्काळ जवळील आरोग्य केंद्राला किंवा 011-23978046 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ऑक्सीजनचे प्रमाण (एसपीओ-2) 95 टक्के पेक्षा कमी झाल्यास, छातीत अधिक कालावधीसाठी दुखणे, दडपण जाणवत असल्यास, मानसिक गोंधळ किंवा झोपेतून जाग येत नसल्यास, बोलण्यात अडखळत असल्यास, हात किंवा चेहऱ्यावर अशक्तपणा असल्यास किंवा हालचाल होत नसल्यास, ओठ किंवा चेहऱ्यावर निळा रंग दिसत असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घेणे बंधनकारक राहील.
जिल्हा व तालुकास्तरीय आरोग्य व्यवस्थेच्या जबाबदारी
गृह अलगीकरणातील सर्व रुग्णांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेची राहील. गृह अलगीकरणात असलेल्या व्यक्तींचे दररोज आरोग्य स्थिती पडताळण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी यांची राहील. प्रत्येक रुग्णाची वैद्यकीय स्थिती उदा. शारीरिक तापमान, पल्स रेट आणि ऑक्सीजनचे प्रमाण नोदवण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकाची राहील.
रुग्णांना वरील बाबींची तपासणी कशी करावी याबाबत क्षेत्रीय व संनिरीक्षण पथकाने मार्गदर्शन करावे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या दैनंदीन आरोग्य तपासणी बाबत असलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होत असल्याबाबत घटना व्यवस्थापक यांनी पडताळणी करुन तसा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणे बंधनकारक राहील.
कोविड-19 पोर्टल आणि फॅसेलिटी ॲपवर गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांबाबत माहिती भरण्यात यावी. घटना व्यवस्थापक यांनी उपरोक्त रुग्णांची माहिती सदर पोर्टल व ॲप मध्ये भरली जात असल्याची खातरजमा करावी. वरील बाबींचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास घटना व्यवस्थापक यांनी रुग्णांवर दंडात्मक कारवाई करुन सदर रुग्णांना तात्काळ आयसोलेशन व कोविड केअर सेंटर मध्ये अलगीकरण कक्षात दाखल करावे. क्षेत्रिय कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या परिवाराची तसेच जवळील संपर्कातील व्यक्तींचे नियमानुसार संनियंत्रण तसेच चाचणी करावी.
गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांना दिलेल्या सुचनांनुसार डिस्चार्ज करावे. डिस्चार्ज सुचनांना अधिन राहून क्षेत्रीय आरोग्य पथकांनी तंदुरूस्ती प्रमाणपत्र (फिटनेस सर्टीफीकेट) संबंधित रुग्णांना द्यावे. तसेच सदर रुग्ण स्थितीबाबत कोविड 19 पोर्टल वर रुग्ण बरे झाल्याबाबत अपडेट करण्यात यावे.
गृह अलगीकरण समाप्त करणेबाबत
लक्षणे निदर्शनास आल्याच्या दहाव्या दिवसानंतर आणि तीन दिवस सलग ताप नसल्यास संबंधित रुग्णांचे गृह अलगीकरण समाप्त झाले आहे असे समजावे. त्यानंतर पुढील सात दिवस संबंधित रुग्णाने घरीच विलगीकरणात राहावे आणि स्वत:च्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवावे. गृह अलगीकरण कालावधी समाप्त झाल्यानंतर चाचणी करण्याची आवश्यकता नाही. जे रुग्ण उपरोक्त अटी व शर्तींचा भंग करतील अशा रुग्णांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये घटना व्यवस्थापक दंडात्मक कार्यवाही करतील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment